चंद्रपूर : नागपूर मार्गावर अपघात, एकजण ठार | पुढारी

चंद्रपूर : नागपूर मार्गावर अपघात, एकजण ठार

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा :  चंद्रपुर शहरामध्ये एकाच दिवशी तीन ठिकाणी अपघात होऊन तिघांना जीव गमवावा लागला. यानंतर जनविकास सेनेने आक्रमक भूमिका घेऊन ८ दिवसांत अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. या घटनेची शाई वाळण्यापूर्वीच नागपूर मार्गावर काल शुक्रवारी पुन्हा एक अपघात झाला. या अपघातात अमोल गोविंदा भडके या व्यक्तीचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी (8 सप्टेंबर) रोजी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान वडगाव प्रभागातील मित्र नगर येथील ४७ वर्षीय अमोल भडके व त्यांच्या दोन  मित्रांना अंजीर-टिव्हीएस शोरूम कडे जायचे होते.  नागपूर मार्गावरील दुभाजक ओलांडण्याकरिता हे तिघे  दुभाजकाजवळ उभे असताना जनता कॉलेज चौकाकडून  येणाऱ्या दुचाकीने अमोल भडकेला जोरात धडक दिली. या धडकेत  त्यांचा मृत्यू झाला. रोजमजुरी करणाऱ्या अमोल भडके यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असून कर्ता पुरुष गमावल्यामुळे या अपघाताने त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले.

रद्द झालेल्या रिंग रोडला पर्याय काय?

शहरामध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. जड वाहतुकीमुळे नागपूर मार्ग, बंगाली कॅम्प-मूलमार्ग व बायपास मार्ग धोकादायक झालेला आहे. या मार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये आजपावतो  अनेक नागरिकांचा नाहक बळी गेला. चंद्रपुरात  प्रस्तावित रिंग रोड रद्द करण्यात आला. जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग आहेत.  चंद्रपूर शहराला रिंग रोडची अत्यंत गरज असताना हा निर्णय घेण्यात आला. मात्र अजूनही त्याला पर्याय देण्यात आलेला नाही.  रिंग रोड ला पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी  जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button