

डोंबिवली; बजरंग वाळुंज : कल्याण-शिळ महामार्गावरील डोंबिवली जवळच्या टाटा नाका परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. दुकानासमोर हातगाडी लावणाऱ्या दोघा बहिणींना बेशुद्ध पडेपर्यंत लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी सुपारीबहाद्दर दुकानदारासह चौघांना गजाआड केले आहे.
हल्लेखोर बुरखाधारी असल्याने त्यांचा चेहरा दिसून येत नव्हता. पोलिसांनी तपासचक्रांना वेग देऊन चार हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. तपासादरम्यान धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. हातगाडी लावण्यावरून दोन बहिणींना मारहाणीची सुपारी त्यांच्या शेजारी दुकान चालविणाऱ्या विशाल राठोड याने दिली होती. दुकानाच्या समोर हातगाडी लागल्याने विशाल याला त्रास होत होता. त्यामुळे त्याने हातगाडीचालक बहिणींना मारण्यासाठी टोळक्याला सुपारी दिली हाेती. २६ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास या दोन्ही बहिणींवर बुरखाधारी तिघांनी हल्ला चढविला होता. आरोपींना गुरूवारी-शुक्रवारी टप्प्याटप्प्याने अटक करण्यात आली.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या टाटा नाका परिसरातील देशमुख होम्सच्या बाजूला मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा राबता असतो. या ठिकाणी अनेक प्रकारची दुकाने ठेले आणि हातगाड्यांवर लावली जातात. याच परिसरात दोन तरुणी हातगाडीवर व्यवसाय करतात. या तरुणींनी हातगाडी लावल्याने शेजारचा दुकानदार विशाल राठोड याला त्रास सुरू झाला होता. या दुकानदाराचा आणि फेरीवाल्या तरुणींचा नेहमीच वाद होता.
सीसीटीव्हीत कैद व्हिडिओनुसार, काही तरुण तरुणींच्या हातगाड्याजवळ आले. चेहरे बुरख्याने झाकून हँडग्लोज घातलेल्या टोळक्याने सोबत आणलेल्या लाठ्या-काठ्यांच्या साह्याने दोन्ही तरुणींवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघी बहिणी बेशुद्ध पडल्या. हे पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. तसेच रस्त्यावरील पादचारी नागरिकांनी देखील यावेळी हा संपूर्ण प्रकार पाहत असल्याचे व्हिडिओत दिसून आले. मात्र या तरुणींना वाचविण्यासाठी कुणीही मधे पडले नाही. खूप उशिराने बेशुद्ध पडलेल्या या बहिणींना काहींनी उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या दोघींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
तिन्ही हल्लेखोर बुरखाधारी होते. त्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती. डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल तारमळे आणि अविनाश वनवे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी शोध मोहीम राबवून दोन्ही तरुणींना मारण्याची सुपारी देणारा दुकानदार विशाल राठोड याच्यासह हल्लेखोर मिलिंद नागवंशी, प्रविण जाधव आणि बाळा शेळके अशा चौघांना बेड्या ठोकल्या.
दुकानदार विशाल राठोड याने तरुणींना धडा शिकविण्यासाठी मिलिंद नागवंशी, प्रविण जाधव आणि बाळा शेळके या तिघांना सुपारी दिली होती. त्याच्या सांगण्यावरुन या तिघांनी दोघा बहिणींना बेशुद्ध पडेपर्यंत बेदम मारहाण केली. सुपारीबहाद्दर दुकानदार आणि त्याच्या साथीदारांना रविवारी कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मदने यांनी सांगितले.