

Chimur heritage Bavli well
चंद्रपूर : चिमुर पासून पाच किमी अंतरावरील कोलारा रोडलगत बाम्हणी फाट्याजवळील सुमारे चारशे वर्षांचा इतिहास साक्षीदार असलेली पायऱ्यांची बावळी विहीर आज अस्तित्वाच्या संकटात सापडली आहे. विहिरीच्या अगदी लगत सुरू असलेल्या रिसोर्ट बांधकामामुळे या पुरातन वारशाला हादरे बसण्याची शक्यता निर्माण झाली असून स्थानिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
चिमुर व परिसरातील ऐतिहासिक वास्तूंपैकी महत्त्वाची मानली जाणारी पायऱ्यांची बावळी विहीर सतराव्या शतकात गोंड राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली. त्या काळी सैन्यांचे व घोड्यांचे पाणीपुरवठा करण्यासाठी विशेषतः ही विहीर उभारण्यात आली होती. दगडी बांधकाम, सुंदर पायऱ्या आणि भव्य वास्तुरचना यामुळे या विहीरीला ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
मात्र, सध्या विहीरीच्या अगदी जवळच सुरू असलेल्या रिसोर्ट बांधकामामुळे या दगडी संरचनेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. बांधकामासाठी खोदलेली जमीन, उभारलेले पिलर आणि त्यातून निर्माण होणारे कंपन विहीरीच्या भिंतींना नुकसान पोहोचवू शकतात, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
विहीरीच्या सभोवती विटा, वाळू, रेती-सिमेंट यांसारखे साहित्य साचले असून त्यातील काही साहित्य विहीरीत कोसळल्याने ती हळूहळू बुजण्याची शक्यता अधिक वाढली आहे. आधीच काही दगडी बांधकाम निघाले असल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे या ऐतिहासिक संरचनेवरील धोक्याची पातळी आणखी वाढली आहे.
पुरातन वास्तूप्रेमी कवडू लोहकरे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की “बाम्हणी फाट्याजवळील ऐतिहासिक वारसा असलेल्या पायऱ्यांच्या विहीरीजवळच रिसोर्टचे बांधकाम सुरू झाले आहे. पिलर उभे करताना निर्माण होणाऱ्या हादऱ्यांमुळे विहीरीला गंभीर धोका आहे. आधीच विहीरीचे दगड निघाले आहेत आणि आता बांधकाम साहित्याने संपूर्ण परिसर घेरल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे.”
लोहकरे यांनी पुरातत्त्व विभागाने या प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन विहीर संरक्षित करण्याची मागणी केली आहे. चिमुरच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग असलेली ही बावळी विहीर दुर्लक्ष आणि अनियंत्रित बांधकामामुळे धोक्यात येत आहे. स्थानिक नागरिक, इतिहासप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या पुरातन वारशाचे जतन करण्यासाठी तत्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. जर वेळेत हस्तक्षेप झाला नाही, तर गोंडकालीन ही वास्तू इतिहासाच्या पटलावरून कायमची पुसली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.