

चंद्रपूर : तेरा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा आरोपी व त्यास मदत करणाऱ्या महिलेस आज बुधवारी (दि. २१) अतिरिक्त सत्र न्यायाधिश पी.जी. भोसले यांनी सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. आरोपीला वीस वर्ष सक्तमजुरी आणि आरोप करण्यास मदत करणाऱ्या महिलेला ५ वर्षांची सक्तमजुरी आणि द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन पडोली हद्दीत जानेवारी २०२० मध्ये एका ३५ युवकाने त्याच्या ३० वर्षीय मैत्रिणीच्या मदतीने घरासमोरीलच १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर स्वतःचे घरी अत्याचार केला. पिडीतेच्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन पडोली येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून तत्कालीन तपासी अधिकारी श्रीमती मेघा गोखरे यांनी आरोपीविरुध्द भक्कम पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. आज बुधवारी (२१ मे,२०२५) रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधिश तथा जिल्हा न्यायाधिश-३ चंद्रपूर, पी.जी. भोसले, यांनी आरोपी व त्यास मदत करणाऱ्या महिलेला विविध कलमान्वये सक्त मजुरी व द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सरकारी अभियोक्ता आसीफ शेख (जिल्हा सरकारी वकील) यांनी युक्तिवाद केला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनात पडोली पोलिस स्टेशनचे पैरवी अधिकारी म्हणुन पोहवा मधुराज रामानुजवार आणि दत्तक अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे यांनी कामगिरी बजावली आहे.