

धुळे; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश श्रीमती यास्मिन देशमुख यांनी सुनावली आहे.
शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस भाऊराव हिलाल भिल याने अमळनेर येथे घेऊन गेला. या ठिकाणी त्याने या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या संदर्भात संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात तपास अंमलदार प्रकाश पोद्दार, उपनिरीक्षक राजेंद्र माळी यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यानंतर भिल याच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आला. या खटल्याचे कामकाज विशेष न्यायाधीश श्रीमती यास्मिन देशमुख यांच्यासमोर चालले. यात विशेष सरकारी वकील अजय सानप यांनी महत्त्वाचे साक्षीदार न्यायालयासमोर आणले. पीडितेची वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर कपिलेश्वर चौधरी डॉक्टर मिलिंद पवार तसेच पीडीतेच्या शाळेतील मुख्याध्यापिका यांच्यासह पीडिता व तिच्या नातेवाईकांचे महत्त्वाचे जबाब न्यायालयाच्या समोर नोंदवण्यात आले. साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे पाहता न्यायालयाने सरकारी वकील सानप यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला. यात भाऊराव भिल याला विविध कलमान्वये दोषी धरून शिक्षा सुनावली.
लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा कलम चार नुसार त्याला सात वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावल्यात आली. तसेच अठरा हजार रुपये दंडाची शिक्षा देखील सुनावण्यात आली. या खटल्याच्या कामकाजासाठी विशेष सरकारी वकील सानप यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तंवर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
अधिक वाचा :