

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा: चैत्र नवरात्रीच्या षष्ठीपासून चंद्रपूरच्या प्रसिद्ध महाकाली यात्रेला प्रारंभ झाला. महिनाभर ही यात्रा चालणार आहे. स्थानिकासह मराठवाडा, मध्य प्रदेश आणि तेलंगणामधून दरवषी भाविक या ठिकाणी येत असतात. महाकाली यात्रा सर्वत्र प्रसिद्ध आहे. चैत्र महिन्यातल्या षष्ठीपासून ते वैशाख पौर्णिमेपर्यंत ही यात्रा चालते. संपूर्ण महिनाभर देवीचा जागर केला जातो.
यंदा कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नाचणारे पोतराज आणि मळवट भरलेल्या महिला भक्तांनी मंदिर परिसर फुलून गेला आहे. तेलंगणा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील मराठवाड्यातून भाविक येथे चांदागडच्या देवीच्या दर्शनाला येतात. महाकाली आपल्या नवसाला पावते, अशी भविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे य़ेथे अनेक नवस बोलली जातात. ही देवी आपला नवस पूर्ण करते. आणि पुन्हा एकदा आपल्याला दर्शनाला बोलावते, अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे.
यंदा भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. एसटी महामंडळाने इतर राज्यातून येणाऱ्या लोकांसाठीही बसेसची व्यवस्था केली आहे. भाविकांच्या येण्याने इथल्या बाजारपेठाही सजल्या आहेत. हळदी, कुंकू, पूजेच्या साहित्यासह इतर दुकानांची मोठी रेलचेल झालीआहे.
हेही वाचा