

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : कोविड काळात 20 टक्के दरवाढ करण्यात आली. तेव्हापासून अजूनही महागडी वीज घ्यावी लागत आहे. पुन्हा वीज कंपन्यांनी राज्यसरकारकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. भविष्यात ही दरवाढ करण्यात येऊ नये याकरीता आज सोमवारी आम आदमी पार्टीच्या वतीने चंद्रपूरात जटपूरा गेट परिसरात विज दरवाढीविरोधात निदर्शने करण्यात आले.
शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला सरकार आल्यास ३०० युनिट घरगुती वापरात ३०% स्वस्त वीज देवू. तसेच भाजपाचे विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. मागील दोन वर्षात उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज दर वाढ व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलने केली आहेत. परंतु अद्याप अंमलबाजवणी करण्यात आलेली नाही. दिलेला शब्द पाळण्यात आला नाही. तर दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मागील आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे. त्याप्रमाणेच पंजाब सरकारने १ जुलै पासून ३०० युनिट घरगुती आणि शेतकऱ्यांना मोफत वीज केली आहे. देशातील विविध राज्यात जे जमत आहे, ते महाराष्ट्रात का शक्य नाही?' असा सवाल आपचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे आंदोलनादरम्यान केला.