

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या एका ५० वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१५) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सावली तालुक्यातील खेडी येथे घडली. स्वरुपा प्रशांत येलट्टीवार असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे सावली तालुक्याती नागरिक चांगलेच संतप्त झाले असून वाघांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सध्या शेतात कापूस वेचणीचे काम सुरू आहे. त्यामुळे स्वरूपा प्रशांत येलट्टीवार ही महिला गावापासून अवघ्या दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या विकास कटकमावार यांच्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती. कापूस वेचणीनंतर दुपारी बाराच्या सुमारास मजूर महिला लगतच्या शेतात लघुशंकेकरीता गेली होती.
दरम्यान, शेताच्या पाळीखाली दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करून फरफटत नेले. यावेळी महिला किंचाळ्यामुळे महिलेचा आवाज अन्य महिलांपर्यंत आल्याने घटना लक्षात आली. मात्र, महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठविला आहे.