

Samruddhi Highway Jijau Statue
बुलढाणा : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा ४२८ वा जन्मोत्सव सोहळा जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा येथे सोमवारी (दि.१२) मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत दर्शनासाठी सकाळपासून जनसागर लोटला होता. सकाळी ६ वाजता राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाडास्थित जिजाऊंच्या जन्मस्थानी जाधव घराण्याचे वंशज राजे विजयसिंह जाधव, शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
तसेच जिजाऊ वंदना, जिजाऊ जन्माचा पाळणा आदी सोहळे झाले. तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही सपत्नीक राजमाता जिजाऊ यांच्या मुर्तीची महापूजा करुन अभिवादन केले. तसेच पालकमंत्री मकरंद पाटील व सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी सकाळी ११अकरा वाजता जिजाऊ जन्मस्थळावर पुजन करून अभिवादन केले.
यावेळी पालकमंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले की, जिजाऊ जन्मभूमी असलेल्या ऐतिहासिक सिंदखेडराजाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी 'सिंदखेडराजा विकास आराखडा' नव्याने तयार करून प्रस्ताव मंजूर करणार आहोत.
यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर,आमदार मनोज कायंदे, माजी मंत्री डॅा. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनीही राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. राष्ट्रमाता जिजाऊ यांचा ४२८ व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने देशभरातून मोठ्या संख्येने येणारे जिजाऊभक्त, शिवप्रेमी हे जिजाऊंच्या जन्मस्थानी नतमस्तक होतात.
या जन्मोत्सवाचा जनमानसात प्रचंड उत्साह दिसून आला. सकाळी आठ वाजता राजवाड्याच्या सून जिजाऊ सृष्टी पर्यंत वाद्यांच्या गजरात पालखी व शोभायात्रा काढण्यात आली.जिजाऊ सृष्टीवर दिवसभर ऐतिहासिक व्याख्याने,शाहिरी पोवाडे,सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रम झालेत.स्वागत कमानी व रांगोळ्या आणि भगव्या पताका व 'जय जिजाऊ जय शिवराय'आदी जयघोषाने वातावरण दुमदुमले होते.
या दौ-यात पालकमंत्री मकरंद पाटील यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर सिंदखेडराजा इंटरचेंज पेज क्र.७ या ठिकाणी उभारण्यात यावयाच्या 'बालशिवबासह जिजाऊ मांसाहेब' यांच्या पुतळ्यासाठी नियोजित जागेची पाहणी केली. यावेळी आ.मनोज कायदे, नगराध्यक्ष सौरभ तायडे, जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील, पोलिस अधिक्षक निलेश तांबे उपस्थित होते.