बुलढाणा : आपल्या अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या नराधम पित्याला विशेष न्यायालयाने पाच वर्षाचा सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंडांची शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा शहरातील मिलिंदनगर भागातील पिडित मुलगी ही १६ जुलै २०१९ व १८ मे २०२० रोजी घरी एकटी होती. तिची आई बाहेरगावी गेलेली होती. यावेळी तिच्या पित्याने वाईट हेतूने मुलीशी लैंगिक चाळे केले. हा प्रकार तीने आई बाहेरगावाहून घरी परत आल्यानंतर तिला सांगितला.
यानंतर आईने शहर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक विनित घाटोळ यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. विशेष न्यायाधीश आर.एन.मेहेरे यांच्या न्यायालयात प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील वसंत भटकर यांनी एकूण सात साक्षीदार तपासले व आरोपी पित्याला शिक्षा करण्याविषयी युक्तिवाद केला. न्यायालयाने पोक्सोनुसार गुन्हा सिध्द झाल्यावरून दोषी पित्याला पाच वर्षाचा सश्रम कारावास व पाच हजार रू.दंड भरण्याची शिक्षा सुनावली.दंड न भरल्यास अतिरिक्त चार महिने साधा कारावास भोगावा लागेल.