

Rain havoc, Yellow Mozenk crushes farmers' dreams
रत्नापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दीड महिन्यापासून येरमाळा परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टीमुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यातच आता सोयाबीन पिकावर आलेल्या यलो मोझेंक रोगाने शेतकऱ्यांची शेवटची आशाही हिरावून घेतली आहे.
पावसाच्या हाहाकारामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. सखल भागातील सोयाबीन पीक पूर्णतः पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगराळ भागातील शेती तरी वाचेल अशी आशा होती, मात्र त्यावरही यलो मोझेंक रोगाने आक्रमण केले आहे. या रोगामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडत असून, पीक पूर्णतः खराब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून पीक पूर्णपणे गेले आहे.
या भीषण परिस्थितीमुळे शेतकरी सरकारवर नाराज आहेत. "सरकार मदतीचे आश्वासन देते, पण प्रत्यक्षात हेक्टरी १३ हजार रुपयांची मदत कमी करून ८ हजार रुपये केली आहे," असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. "आमच्या डोळ्यासमोर उभे असलेले सोयाबीनचे स्वप्न आता राख झाले आहे.
बाजारपेठा कोलमडल्या, शेत मसनवटा झाले, मग सरकार काळजाला पाझर फोडणार कधी?" असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे.या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. खरीप कर्जमाफीसह विशेष पॅकेज जाहीर करण्याची त्यांची मागणी आहे. जर सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत, तर शेतकरी मोठे आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. सध्या शेतकरी शासनाच्या ठोस निर्णयाची वाट पाहत आहेत.