

Baba Gujar resignation Ajit Pawar NCP
नागपूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शिवराज उर्फ बाबा गुजर यांनी आपला अध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठविला आहे. आपण व्यक्तिगत कारणामुळे पद सोडत असल्याचे सांगतानाच त्यांनी मंत्री आम्हाला विश्वासात घेत नाहीत. पदाधिकाऱ्यांचे ऐकणार नसेल, तर चिंतन करून काय उपयोग अशी नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरानंतर या राजीनाम्याने पक्षातील नाराजीनाट्य पुढे आले आहे. अजित पवार कार्यकर्त्यांचे योग्य काम असले तर ऐकतात. पण, बाकी मंत्री काहीच ऐकत नाहीत. महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्याचा अध्यक्ष असू द्या त्याच्या लेटर हेडची पक्षाच्या मंत्र्यांकडे किंमत नाही, असा स्पष्ट आरोप शिवराज बाबा गुजर यांनी माध्यमांशी बोलताना आज (दि.२३) केला. पक्षाचे नेते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत. पक्षाच्या कार्यालयात येत नाहीत किंवा दौऱ्याची माहिती किंवा साधी सूचना देखील देत नाहीत, असा खळबळजनक आरोपही बाबा गुजर यांनी केला.
आठ वर्षे पक्षाने संधी दिली. आधीचे सहा वर्षे शरद पवार यांच्या नेतृत्वातील एकीकृत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष होतो. माझ्यापेक्षा चांगला अध्यक्ष पक्षाला भेटला तर माझे नेटवर्क तयार आहे. प्रदेशात संधी दिली तर संधीचे सोने करीन.पुन्हा मला सांगितले तर मी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. चिंतन शिबिरात अजित पवार यांना भेटून यासंदर्भात सांगितले होते. माझ्या मनात नाराजी नाही. मी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सोबत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आजपासून पक्षाला कामाला लागावे लागेल.
स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वगळत राहिले तर चिंतन करून काय उपयोग? असा गुजर यांचा थेट नेत्यांना सवाल होता. कोणत्याही जिल्ह्याचा अध्यक्ष असू द्या त्याच्या लेटर हेडची पक्षाच्या मंत्र्यांकडे किंमत नाही. जिल्हाध्यक्षाचा मान सन्मान होत नाही.रामटेक आणि हिंगण्याच्या स्थानिक आमदाराला आमचे मंत्री घेऊन फिरतात. पण पदाधिकाऱ्यांना सोबत घेत नाहीत. कृषिमंत्री दत्ता भरणे यांचा रामटेक येथे कृषी मेळावा होता. पण बॅनरवर अजित पवार यांचा फोटोच नव्हता. आम्ही वर तक्रार केली तेव्हा चुका सुधारल्याचे गुजर म्हणाले.