Khamgaon Jalna Railway Project | खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू; पीएम मोदींच्या आश्वासनाला १२ वर्षांनंतर मूर्त स्वरूप

१६२ किलोमीटर लांबीच्या नव्या ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती मिळणार
Khamgaon Jalna New Railway Line Land Acquisition
Khamgaon Jalna New Railway Line Land AcquisitionPudhari
Published on
Updated on

Khamgaon Jalna New Railway Line Land Acquisition

बुलढाणा : सुमारे ११५ वर्षांपासून बहूप्रतिक्षित असलेल्या आणि विदर्भ- मराठवाड्याला जोडणाऱ्या १६२ किलोमीटर लांबीच्या खामगाव-जालना नव्या ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. केंद्र सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भूसंपादनाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली असून रेल्वे मार्गाच्या उभारणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण यापूर्वीच पूर्ण झाले असून आता जमीन संपादन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये खामगाव येथे झालेल्या निवडणूक प्रचार सभेत खामगाव-जालना रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. तब्बल १२ वर्षांनंतर या आश्वासनाच्या पूर्ततेच्या दिशेने ठोस हालचाल झाल्याने बुलढाणा आणि जालना जिल्ह्यांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Khamgaon Jalna New Railway Line Land Acquisition
Buldhana Crime : आठ वर्षीय मुलाची साक्ष ठरली निर्णायक

मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या जाळ्याला जोडणारा हा मार्ग विदर्भ आणि मराठवाडा या दोन महत्त्वाच्या प्रदेशांमधील दळणवळण अधिक सक्षम करणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाला "विशेष रेल्वे प्रकल्प" म्हणून अधिसूचित केले आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने राष्ट्रीय पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जालना आणि बुलढाणा जिल्ह्यांतील आवश्यक जमिनी संपादित करण्यात येणार आहेत.

खामगाव-जालना रेल्वे मार्गाला ‘पुंजी निवेश कार्यक्रम’ अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चातील ५० टक्के हिस्सा महाराष्ट्र शासन उचलणार असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यानंतर राज्य सरकारने प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता.

Khamgaon Jalna New Railway Line Land Acquisition
Buldhana News : 'त्या'कथित खुनाच्या तपासातील निष्काळजीपणा उघड, 'एलसीबी'तील चौघांची तडकाफडकी उचलबांगडी..

इंग्रजकालापासून प्रलंबित असलेल्या या रेल्वे मार्गाची मागणी बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. अनेक लोकसभा निवडणुकांमध्येही हा मुद्दा प्रमुख ठरला होता. बुलढाण्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रकल्पाला गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही प्रदेशांतील औद्योगिक, व्यापारी आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळेल, तसेच दोन्ही भागांमधील दळणवळण अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news