

Mutton sales along the Palkhi route should be stopped
देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अंढेरा येथील संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अंढेरा, देऊळगाव मही व देऊळगाव राजा येथील पालखी मार्गावरील मटन, चिकन व मास विक्रीची दुकाने बंद ठेवावीत तसेच अंढेरा फाटा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यावरच सुरू असलेली बोकड, कोंबड्या व माशांची कत्तल तातडीने थांबवावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख सुदाम काकड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत अंढेरा पोलिस ठाण्याच्या जमादारांना दिलेल्या निवेदनात म्हंतटले आहे की, २ जुलै देऊळगाव मही तर ३ जुलै रोजी देऊळगाव राजा येथे संत मुक्ताबाई पालखीचा मुक्काम आहे. यावेळी हजारो वारकरी व भाविक पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
अशा वेळी पालखी मार्गावर मटन, चिकन व मासेविक्री सुरू राहिल्यास वारकरी संप्रदायाच्या धार्मिक भाव दुखावल्या जाऊ शकतात. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पालखी सोहळ्या दरम्यान पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत ठेवावी, स्वच्छता राखावी व शांततापूर्ण वातावरण कायम ठेवावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुदाम काकड यांच्यासह संदीप राऊत, तुळशीराम पंडित, स्वप्नील शहाणे, सुभाष डोईफोडे, राजू राऊत, महिला शिवसेना तालुका सर्कल प्रमुख रीता काळे, दिनकरराव देशमुख, दीपक तेजणकर समाधान राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तातडीने कारवाई करावी
अंढेरा फाटा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगतच बोकड, कोंबड्या व माशांची कत्तल केली जाते. याच मार्गाने संत मुक्ताबाई पालखीचे आगमन होते. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होत असून पालखीच्या पाक्रियावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यावर तातडीने कारवाई करून संबंधितांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.