

बुलढाणा : विधानसभा निवडणुकीत अगदीच निसटता विजय झाल्याने शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वकीय नेत्यांवर आरोपांची आगपाखड करण्याचे सत्र अद्यापही सुरूच ठेवले आहे. चार दिवसांपुर्वी आ.गायकवाड यांनी त्यांचे मताधिक्य घटल्याचे खापर त्यांच्याच पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि जिल्ह्यातील भाजपाचे आमदार डॉ. संजय कुटे या दोघांवर फोडलेले आहे. गायकवाड यांनी आज (दि.१) पुन्हा एकदा माध्यमांसमोर जाधव व कुटे यांनी आपल्याविरोधात कटकारस्थान रचल्याचे गंभीर आरोप केले.
माझ्या विरोधातील उमेदवार ठरवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मातोश्रीवर मिलिंद नार्वेकरांना, तर भाजपा आमदार संजय कुटे यांनी अनिल परब यांना फोन करून बुलढाण्याची शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी जयश्री शेळके यांना द्यावी. सीट निवडून आणण्यासाठी आम्ही मदत करू, असे सांगितल्याने रविकांत तुपकर यांना मिळू शकणारी ठाकरे गटाची उमेदवारी ऐनवेळी जयश्री शेळके यांना देऊन माझे मताधिक्य घटवण्याचे कटकारस्थान झाले. जाधव व संजय कुटे यांनी माझ्याशी गद्दारी केली आहे, असा स्पष्ट आरोप आ.गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना केला.
जाधव -कुटे या दोन्ही नेत्यांविषयी चिखलीच्या भाजपा आमदार श्वेताताई महाले व मेहकरचे शिवसेना शिंदे गटाचे पराभूत उमेदवार संजय रायमूलकर यांचाही आक्षेप असल्याचे आ.गायकवाड यांनी सांगितले. यावरून बुलढाणा, चिखली व मेहकर या तीनही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या अडचणी वाढवण्याचे काम स्वकीयांकडूनच झाल्याचे दिसून येते. माझ्या विरोधातील उमेदवार व भाजपा आमदार संजय कुटे यांची रात्री २.३० वाजता मिटींग झाली होती. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ९९ टक्के कार्यकर्ते आपल्या विरोधात काम करत होते, असाही आरोप गायकवाड यांनी केला आहे.
शिवसेना व भाजप दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे आपण पुराव्यानिशी लिखित तक्रारी पाठवल्याचेही गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे एकूणच जिल्ह्यातील महायुतीतील 'गृहकलह' राजकीय वर्तुळात सुरसपणे चर्चिल्या जात आहे.