

LCB's crackdown on illegal sand transportation
देऊळगावराजा, पुढारी वृत्तसेवा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक मोठी धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतुकीचा पर्दाफाश केला. या कारवाईत तब्बल ३० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ही कारवाई अंढेरा पोलिसांच्या हद्दीत सलग तिसऱ्यांदा एलसीबीकडून पार पडल्याने स्थानिक पोलिसांच्या निष्क्रियतेकडे बोट उठू लागले आहे.
खबऱ्यांच्या माहितीवरून कोनड खुर्द शिवारात नाकाबंदी करण्यात आली. त्या दरम्यान टिप्पर थांबवून पाहणी केली असता त्यात ६ ब्रास रेती (किंमत ६०,०००) आढळली. चालकाकडे कोणताही वैध परवाना नसल्याने सदर टिप्परसह एकूण ३० लाख ६० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच गुरुवारी (दि.१३) दिग्रस शिवारात हायवा पकडला आहे. ४० हजार रुपये किमतीची चार ब्रास वाळू जप्त केली. दोन दिवसांत ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कारवाई पथकात प्रताप बाजड, शरद गिरी, पुरषोत्तम आघाव, नीलेश राजपूत आणि विकास देशमुख (एलसीबी) यांचा समावेश होता. दरम्यान, अंढेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून एलसीबीकडूनच सलग दारूबंदी, वाळू तस्करी आणि चोरीसंबंधी कारवाया केल्या जात आहेत.