

देऊळगाव राजा ः छत्रपती संभाजीनगर - नागपूर महामार्ग (मार्ग क्र. 753) वरील देऊळगाव मही गावातील दिग्रस चौफुली परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांच्या जीवितास धोका ठरणारा मोठा खड्डा अखेर बुजवण्यात आला आहे. दरम्यान, दैनिक पुढारीमध्ये 11 जानेवारी रोजी या संदर्भात बातमी प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची दखल घेत महामार्ग प्रशासनाने दुरुस्तीची कारवाई केली.
दरम्यान, या खड्ड्यामुळे वाहनचालक, शाळकरी मुले, रुग्णवाहिका तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः 9 जानेवारी रोजी याच खड्ड्यात दुचाकी घसरून पडल्याने एका शाळकरी मुलाला मार लागल्याची घटना घडली होती.
या प्रकारानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने खड्डा दुरुस्त केला आहे. खड्डा बुजवल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, ग्रामस्थांनी दैनिक पुढारी व संबंधित पत्रकाराचे आभार मानले आहेत. वेळेवर प्रसिद्ध झालेल्या या बातमीमुळे प्रशासनाला जाग येऊन संभाव्य अपघात टळले, अशी भावना परिसरात व्यक्त होत आहे.