

जालना ः जालना शहर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी जालना शहरातील 291 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जालना शहर महानगरपालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी मंगळवार, दि. 13 रोजी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी त्यांनी शहरातील व्ही. एस. एस. कॉलेज, दिनदयाळ उपाध्याय हॉल (विद्युत कॉलनी), ऑक्सफर्ड इंग्रजी शाळा, जालना शहर महानगरपालिका प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा (विसावा) नूतन वसाहत, जालना, सीटीएमके गुजराती विद्यालय अशा एकूण 05 ठिकाणी असलेल्या 21 मतदान केंद्रांची पाहणी केली. पाहणीदरम्यान मतदान केंद्रांवरील पुरेशी प्रकाश व्यवस्था, दार-खिडकींची स्थिती, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तसेच दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची उपलब्धता याबाबत सखोल तपासणी करण्यात आली.
मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व मतदान केंद्रांवरील मूलभूत सुख-सुविधा वेळेत व योग्य प्रकारे उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी व आयुक्त जालना शहर महानगरपालिका आशिमा मित्तल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या पाहणीवेळी शहर अभियंता सय्यद सऊद, पाणीपुरवठा अभियंता अनिल भद्रे, विद्युत अभियंता कोमल गावंडे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
मतदानासाठी परिशिष्ट-2 ची अट
ज्या मतदारांच्या नावावर दुबार असा शिक्का मारण्यात आला आहे, असे मतदार जेव्हा मतदान केंद्रावर जातील, तेव्हा त्यांना थेट मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, अशा मतदारांना आपली ओळख पटवण्यासाठी आणि आपण अन्य कोठेही मतदान केले नसल्याची खात्री देण्यासाठी परिशिष्ट-2 हा नमुना अर्ज भरून द्यावा लागेल. त्यानंतरच त्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल.