

बुलढाणा : महाराष्ट्रातील शेतकरी सध्या गंभीर संकटात आहेत. सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगाम पूर्णपणे खराब झाला असून सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मात्र, युतीचे सरकार शेतकऱ्यांच्या या संकटाकडे दुर्लक्ष करत फक्त घोषणाबाजी करत असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या भागात जाऊन फोटोसेशन पूर्ण करून परतले, पण मदतीसंदर्भातील ठोस घोषणा नाही, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी बुलढाणा व मोताळा तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे प्रभावित पीकक्षेत्रांची पाहणी केली. जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल बोंद्रे आणि आमदार धीरज लिंगाडे देखील या पाहणीसोबत होते.
सपकाळ यांनी यावेळी सांगितले, “अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरसाठी ५० हजार रुपये, जमीन खरवडून गेल्यास एकरी २ लाख रुपये, तसेच रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील मिळावी. सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून हेक्टरसाठी ३ हजार रुपयेही मिळणार नाहीत.”
सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला की, शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून भरीव पॅकेज घेऊनच परतावे; अन्यथा दिल्लीतच थांबावे. काँग्रेस पक्षाने ३ ऑक्टोबर रोजी राज्यभर शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.