

बुलढाणा : शेतातील तूर पिकाच्या मळणीसाठी थ्रेशर मशिनसह जात असलेले ट्रॅक्टर अचानक उलटल्याने त्याखाली दबून एका युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या अपघातात अन्य एक युवक गंभीर जखमी झाला आहे.
मोताळा तालुक्यातील सहस्त्रमुळी तांडा शिवारात रविवार दि.१८ जाने.च्या सायंकाळी ४.३० वाजता हा अपघात झाला. सौरव हरिश्चंद्र जाधव (२२)रा.सहस्त्रमुळी असे मृत तरुणाचे नाव आहे . सद्या तूर मळणीचा हंगाम सुरू असून मळणी यंत्र जोडलेले ट्रॅक्टर (क्र.एमएच२८-एजे ७२१९) हे एका शेतातील तुरीची मळणी करून अन्य शेताकडे चालले होते.
दरम्यान शेताच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर व मळणी यंत्र जागेवरच उलटले.त्यावेळी ट्रॅक्टरखाली दबल्याने सौरव जाधव याचा मृत्यू झाला.तर महेश मोतेसिंग जाधव (२०)हा तरुण अपघातात गंभीर जखमी झाला आहे. या दु:खद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती कळताच बोराखेडी पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी मदतीसाठी धावले.जखमी झालेल्या महेश जाधव याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे .