

Shivshahi bus triple seat bike accident
बुलढाणा: समोरुन भरधाव आलेली ट्रीपल सीट दुचाकी शिवशाही बसला धडकल्यामुळे दुचाकीवरील तीन तरूण दूर फेकले गेल्याने ठार झाले. धाड गावाजवळील करडी नदीच्या पुलावर सोमवारी (दि.५) सायंकाळी ४ वाजता हा भीषण अपघात झाला.
तिघेही मृत तरुण हे ढालसावंगी (ता. बुलडाणा) गावचे रहिवासी आहेत. या दुर्घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे. मलकापूर आगाराची शिवशाही एस.टी.बस (एमएच०६- बीडब्ल्यू ३६३८) ही छत्रपती संभाजीनगर येथून मलकापूरकडे जात होती.
या दरम्यान धाड गावाजवळील करडी नदीच्या पुलावर ही बस आली असता धाडकडून करडी गावाकडे चाललेल्या ट्रिपलस्वार दुचाकीने (एमएच२८-बीझेड ७२४२) बसला समोरुन जोरदार धडक झाली. या भीषण दुर्घटनेत दुचाकी ही बसच्या चाकाखाली दबली गेल्याने चक्काचूर झाली. तर दुचाकीवरील अंकुश सुखदेव पाडळे (वय ३२), रवी सुरेश चंदनशिव (वय २३), कैलास साहेबराव शिंदे (वय ३०, रा.ढालसावंगी) यांचा जागीच मृत्यू झाला. यातील एकाचा मेंदू कवटीतून बाहेर पडल्याचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही ग्रामीण रूग्णालयात हलवले, मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.