बुलढाणा : श्री संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

बुलढाणा : श्री संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीच्या पर्वावर विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी संत गजानन महाराजांच्या पालखीचे सातशे पायदळ वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पालखी सोहळ्याचे हे ५५वे वर्ष आहे. आज (दि.१३) सकाळी ७ वाजता मंदिर प्रांगणात संस्थानच्या विश्वस्तांनी श्रींच्या रजत मुखवट्याचे विधीवत पूजन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही श्रींचे दर्शन घेतले. मंदिराच्या प्रांगणातून ७०० वारकऱ्यांसह व हजारो भाविकांच्या उपस्थितीत राजवैभवी थाटात पालखीने श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी टाळ मृदंगाचा निनाद व हरिनामाच्या घोषाने संतनगरी दुमदुमून गेली.

यानिमित्ताने शेगावात मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी श्री क्षेत्र नागझरीपर्यंत पालखीसोबत चालून निरोप दिला. पालखी मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात आल्या होत्या. तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने,चहा,पाणी, मठ्ठा वितरित करण्याची व्यवस्था करण्यात आली होती .

श्रीं ची पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परभणी, परळी वैजनाथ,उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर या मार्गाने नऊ जिल्ह्यातून ७५० कि.मी.चा पायी प्रवास करून ३३ दिवसांनी १५ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचणार आहे.

श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी दिवसांचा मुक्काम करणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठूरायाचे दर्शन व काल्याचे किर्तन आटोपून दि.२१ जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगांवकडे परतीच्या मार्गाने निघून दि ११ ऑगस्ट रोजी संतनगरी शेगावला परत पोहचणार आहे.

पांढरा सदरा, धोतर,डोक्यावर टोपी, कपाळावर बुक्का, गळ्यांत तुळशीची माळ असा पेहराव केलेले वारकरी खांद्यावर भगवी पताका घेत विठूनामाचा गजर करत मार्गक्रमण करतानाचे दृष्य मनोहारी असते. पंढरपूर वारीदरम्यान वाटेत भेटणाऱ्या अन्य दिंड्यांमधील विणेकऱ्यांना श्री संस्थानव्दारा कापड प्रसाद प्रदान केला जातो. श्रींचे पालखी सोबत ७०० वारकऱ्यांसह २ अश्व व ९ वाहने आहेत. वारकऱ्यांचे सुविधेसाठी रुग्णवाहिका व वैद्यकीय पथकही सोबत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news