

बुलढाणा : जळगाव तालुक्यातील राजूरा धरण शिवारातील एका विहिरीत आपल्या चार अपत्यांना ढकलून एका निर्दयी पित्यानेही त्याच विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. ही हृदयद्रावक घटना आज सोमवार (दि.२५) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भाले अंजन या आदीवासी पाड्यावर राहणा-या विजय मुसा खिराडिया (वय : ३५, वर्षे) याने त्याच्या पत्नीला चार कि.मी.अंतरावर असलेल्या इस्लामपूर येथे माहेरी पोहचवून दिले. व तेथून घराकडे परततांना वाटेत राजूरा धरण शिवारातील एका सजल विहिरीत त्याची दोन मुले प्रित (८),पियुष (२), दोन मुली प्राची (६) व पूर्वी (४) या पोटच्या चार चिमूकल्यांना विहिरीत ढकलून दिले.
त्यानंतर त्यांनी स्वतःही त्याच विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. ही पाचही जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आली आहेत. जळगाव जामोद या घटनेची चौकशी करीत आहेत. घटनेचे कारण अद्याप समोर आले नाही.