Bhandara Murder | गावाच्या वेशीबाहेरील जंगलाने वेढलेल्या निर्मनुष्य परिसरात वृद्ध पहारेकऱ्याची गळा चिरुन निर्घृण हत्या!

भंडारा जिल्ह्यातील सीतासावंगी येथील घटना, बंद पडलेल्या कुक्कुटपालन केंद्रावर होते पहारेकरी
Murder
MurderPudhari
Published on
Updated on

भंडारा: तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे एका वृद्ध पहारेकऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गावाच्या वेशीबाहेरील जंगलाने वेढलेल्या निर्मनुष्य परिसरात घडल्याने संपूर्ण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत व्यक्तीची ओळख महादेव शंकर कामठे (वय ६७) अशी झाली असून ते गावाबाहेरील वाहिद कुरेशी यांच्या बंद पडलेल्या कुक्कुटपालन केंद्रावर (पोल्ट्री फार्म) पहारेकरी म्हणून कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांची हत्या केली. घटनेच्या वेळी परिसरात अन्य कोणीही नसल्याने आरोपींना गुन्हा करण्यास संधी मिळाल्याचे सांगितले जात आहे.

सकाळी घटनेची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी पाठविला. प्राथमिक तपासात हत्येमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस वैयक्तिक वैमनस्य, लूटमार तसेच इतर संभाव्य कारणांचा तपास करत असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात काही ठिकाणी जादूटोणा किंवा करणीबाबत कुजबूज सुरू असली, तरी या संदर्भात पोलिसांनी कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.

Murder
झाडाला लटकलेल्या अवस्थेत अनोळखी महिला-पुरुषाचे कुजलेले मृतदेह सापडले

तपासासाठी विविध पथके
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गोबरवाही पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी (तुमसर), फॉरेन्सिक पथक, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा तसेच श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. सर्व पथके एकत्रितपणे पुरावे गोळा करून आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

 परिसरात भीतीचे वातावरण
या निर्घृण हत्येनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पोलिसांनीही गुन्ह्याचा लवकरच उलगडा करून दोषींना अटक केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news