

बुलढाणा: जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीने उच्छाद मांडला आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे विशेष मोहिमे अंतर्गत रविवार,दि.१६ रोजी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ४७ टिप्पर वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी १० लाखांहून अधिक दंड वसुल केला. तसेच देऊळगांव राजा तालुक्यातील सिनगाव जहाँगीर व खल्याळ गव्हाण परिसरात जिल्हाधिकारी यांनी अवैध वाळू उत्खननाच्या ठिकाणी धाड टाकून गुन्हे दाखल केले आहेत.
यापूर्वी १४ ॲागस्ट रोजी जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी अनेक ठिकाणी आकस्मिक धाडी टाकून एकाच दिवशी अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या विनानंबरच्या ३९ टिप्परवर ६.५० लाखांची दंडात्मक कारवाई केली होती. याचपद्धतीची कारवाई १९ मे रोजी देखील केली होती.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या पथकाने महसूल, परिवहन, पोलीस व अन्य विभागाच्या संयुक्त कारवाईव्दारे जिल्ह्यात १ एप्रिल ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीसंदर्भात ८९७ प्रकरणांमध्ये कारवाई केली.यामध्ये ४१४ प्रकरणे अवैध उत्खनन,वाहतुकीशी संबंधित आहेत.
४८३ विना नंबर वाहनांवर कारवाई केली,तर ११० प्रकरणांत गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व कारवाईमधून जिल्हा प्रशासनाने एकूण ४कोटी ८७ लाख रुपयाची दंडात्मक कारवाई केली आहे. अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हानिकाली यांनीच धडक कारवाईची मोहीम राबवल्याने अवैध गौनखनिज माफियांनी धसका घेतला आहे.