Buldhana Crime : वांग्याच्या शेतात अफूचा 'मळा'; LCB चा छापा, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

११ किलो ४७९ ग्रॅम वजनाचे ओले अफू पीक जप्त
Buldhana Crime : वांग्याच्या शेतात अफूचा 'मळा'; LCB चा छापा, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
Published on
Updated on

बुलडाणा : वांग्याच्या पिकाच्या आड छुप्या पद्धतीने अफूची शेती करणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. चिखली तालुक्यातील मेरा खुर्द शिवारात बुधवारी पहाटे ही धाडसी कारवाई करण्यात आली. या छाप्यात पोलिसांनी सुमारे ९ लाख १८ हजार ३२० रुपये किमतीचा ओला अफू आणि बोंडे जप्त केली असून, आरोपी शेतकऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

वांग्याच्या पिकात लपवला होता अफू

मिळालेल्या माहितीनुसार, अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मेरा खुर्द शिवारात गट क्रमांक २०३ मधील शेतात कृष्णा हरीराम वाघमारे (वय २६) या शेतकऱ्याने अफूची लागवड केली होती. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने वांग्याच्या पिकाच्या मध्ये ही प्रतिबंधित रोपे लावली होती. चोरट्या मार्गाने अमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने ही लागवड करण्यात आली होती. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेला या विनापरवाना शेतीबाबत अत्यंत गोपनीय माहिती मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचला.

पहाटेच्या सुमारास छापेमारी

बुधवारी २५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या शेतात छापा टाकला. यावेळी वांग्याच्या झाडांमध्ये अफूची रोपे आणि त्यावर लागलेली कच्ची बोंडे आढळून आली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत ११ किलो ४७९ ग्रॅम वजनाचे ओले अफू पीक जप्त केले. या मालाची बाजारपेठेतील किंमत ९ लाख १८ हजार रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलीस पथकाची मोठी कारवाई

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबूलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पीएसआय अविनाश जायभाये, एएसआय राजकुमार राजपूत, दीपक लेकुरवाळे, गजानन दराडे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

आरोपीवर गुन्हा दाखल

या प्रकरणी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये अमली औषधी द्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ (NDPS) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कृष्णा वाघमारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या बेकायदेशीर कृत्यामध्ये आणखी कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news