

Wedding of Chhatrapati Shivaji Maharaj and Maharani Gunwantabai
बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा
इतिहासाच्या पानांवर दुर्लक्षित राहिलेल्या पण स्वराज्याच्या उभारणीत अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या करवंडच्या इंगळे घराण्याने आपल्या रक्ताने ही माती सिंचली आहे. १६४८ च्या बेलसर युद्धात पराक्रम गाजवणारे सरदार शिवाजीराव इंगळे यांच्या कन्या गुणवंताबाई यांचा विवाह १५ एप्रिल १६५७ रोजी शिवरायांशी झाला. हा केवळ कौटुंबिक सोहळा नव्हता, तर राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या मुत्सद्देगिरीतून विखुरलेल्या मराठा सरदारांना स्वराज्याच्या भगव्या ध्वजाखाली एकत्र आणण्याची ती एक महान रणनीती होती.
दोन कन्या, दोन दिशा : रायगड आणि तंजावर
या घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच मातीतील दोन कन्यांनी महाराष्ट्राचे आणि दक्षिणेचे सिंहासन सावरले. महाराणी गुणवंताबाई साहेबांनी रायगडाची प्रतिष्ठा वाढवली, तर त्यांच्या भगिनी दीपाबाई साहेब यांनी तंजावरच्या गादीवर आपली राजकीय प्रगल्भता सिद्ध केली. खुद्द शिवछत्रपतींनी दीपाबाईंना पत्राद्वारे 'घरची लक्ष्मी' संबोधून त्यांच्या मुत्सद्देगिरीचा गौरव केला होता.
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील करवंड येथील सरदार शिवाजीराव इंगळे यांनी शहाजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत आदिलशाही विरूद्ध अनेक मोहिमांत भाग घेतला होता.त्यांनी स्वराज्यासाठी तलवार चालवली. अफजलखान भेटीच्या वेळी पराक्रम गाजवला होता.
छत्रपती शिवरायांच्या आठव्या धर्मपत्नी गुणवंताबाई महाराणी साहेब यांचे माहेर बुलढाणा जिल्ह्यातील करवंड (ता.चिखली)हे आहे. शिवरायांचे एक सरदार शिवाजीराव इंगळे यांच्या सुकन्या गुणवंताबाई व शिवरायांचा विवाह सोहळा १५ एप्रिल १६५६ रोजी संपन्न झाला होता.३७० वर्षांपूर्वीच्या त्या ऐतिहासिक सोहळ्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक विभाग आणि करवंड महोत्सव कृती समितीने बुधवार दि.१५ रोजी 'ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६' आयोजित केला आहे.
छत्रपती शिवरायांचे वंशज तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करवंड महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. यावेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच शिवरायांच्या सर्व महाराणी साहेब यांच्या माहेरच्या निंबाळकर, मोहिते, पालकर, गायकवाड, शिर्के, जाधवराव, विचारे व इंगळे या घराण्यांतील वंशजही प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवाच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन नागरिकांना घडणार असून सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. करवंड महोत्सवाची सुरुवात सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिषेक करून होईल. त्यानंतर भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात लेझीम पथक, बँड, अश्वदल, पालखी असेल आणि छत्रपती शिवराय व महाराणी गुणवंताबाई साहेब यांच्या ऐतिहासिक वेषभुषा केलेले तरूण - तरूणी सहभागी असतील. शिवकालीन युद्धकला जसे की लाठी, तलवारबाजी, दांडपट्टा आणि आगीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली जातील. प्राचीन शस्त्रे व नाण्यांची प्रदर्शनीही ठेवण्यात आली आहे.
दुपारच्या सत्रात
शिवशाहीर प्रवीण फणसे यांचा (मुंबई) पोवाडा तर प्रा. यशवंत गोसावी यांचे 'ऐतिहासिक व्याख्यान' होईल आणि शाहीर विक्रांत राजपूत लोककला सादर करतील. रामचंद्र पाटील (पुणे) यांचे 'युगपुरुष शिवराय' या विषयावर तर डॉ. नम्रता भोसले-मोहिते यांचे 'मराठाकालीन स्त्री सामर्थ्य' या विषयावर व्याख्यान होईल.
रात्री ७ ते १० या वेळेत 'मराठी पाऊल पडते पुढे' हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. उदय साटम यांच्या दिग्दर्शनाखाली ४५ कलाकार भव्य स्टेजवर शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंग व महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आविष्कार सादर करतील. कोल्हापूर व साता-याचे ५० कलावंत 'तीर्थ शिवराय महानाट्य सादर करतील. या करवंड महोत्सवाची सांगता रात्री १० वाजता बावन्न बुरुजांवरून होणाऱ्या नयनरम्य आतिषबाजीने होईल.