बुलढाणा : जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा शेतशिवारात दोन एकर क्षेत्रामध्ये एकाने प्रतिबंधित गांजा वनस्पतीची अवैधरित्या लागवड केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून जळगाव जामोद पोलीसांच्या पथकाने छापा मारून ४ कोटी ५१ लाख किंमतीचा ४५०५ किलो गांजा जप्त केला. आरोपी हिरालाल मांगीलाल वास्कले (रा.भिंगारा) याला याप्रकरणी अटक केली आहे. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी फरार झाला आहे. जळगाव जामोदचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नितळ यांच्या पथकाने महसूल व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भिंगारा शिवारात ही मोठी कारवाई केली.
यानंतर पोलीसांनी गांजा लागवड केलेल्या शेताची पाहणी करून पुढील कारवाई केली. या कारवाईत ४५०० किलो ओलसर गांजा वनस्पती व ५ किलो सुकलेला गांजा आणि डिझेल पंप तसेच पाईप अशी सामग्री जप्त केली आहे. आरोपीने वनविभागाच्या अतिक्रमित जमिनीवर पहाडी भागात दोन एकर क्षेत्रात गांजा पिकांची लागवड केल्याची माहिती समोर आली.