बुलढाणा : मेहकर शहर परिसरात एका कारमधून गांजाची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून संशयित कारमधून २ लाख ३२ हजार किंमतीचा ११ किलो ६०० ग्रॅम गांजा जप्त केला. शनिवारी (दि.२६) दुपारी मेहकर शहरातील चोपडे ले-आऊट परिसरात ही कारवाई करण्यात आली.
आरोपी गणेश किशोर दिक्षित (२४) रा.डोणगाव ता. मेहकर याला अटक करून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली. गुन्हा दाखल करून एकूण ६लाख ३२हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. फरार झालेल्या अन्य आरोपींचा पोलीस पथक तपास करीत आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे, आशिष घेतले, पीएसआय प्रताप बाजड यांच्या पथकाने ही कारवाई केली.