पुढारी ऑनलाईन डेस्क : समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ पिंपळखुटा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचा भीषण अपघात घडला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून बस थेट डिव्हायडरला धडकून उलटली. यानंतर ट्रॅव्हल्स बसने पेट घेतल्यामुळे २६ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे तर सातजण सुखरुप आहेत. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याचबरोबर बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, अशा शब्दात सरकारवर निशाणा साधला आहे. (Buldhana Bus Accident)
माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे सिंदखेडराजा परिसरात विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात घडला. अपघातानंतर बसने पेट घेतला. अपघात एवढा भीषण होता की, २६ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर सातजण सुखरुप आहेत. शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. ही बस नागपूरहून पुण्याला जात होती. यातील बहुतांश प्रवासी यवतमाळ, वर्धा, नागपूर येथील होते.
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याचबरोबर बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, अशा शब्दात सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे वृत्त मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरुच आहेत. आतापर्यंत ३०० हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करतो."