Buldana Urban Pune Scam | बुलडाणा अर्बनच्या पुणे शाखेत ३४.७७ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

माजी सीईओ शिरीष देशपांडे, विभागीय अधिकारी योगिनी पोकळे यांच्यावर डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल
Buldana Urban Pune Scam
AI photo
Published on
Updated on

Buldana Urban Bank News

बुलढाणा : बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पुणे शाखेत तब्बल ३४ कोटी ७७ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार वैधानिक लेखापरीक्षण अहवालातून समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून सोसायटीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष दिनकर देशपांडे आणि पुणे विभागीय अधिकारी योगिनी योगेश पोकळे यांच्याविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोसायटीचे मुख्य लेखापाल मोहन रघुनाथ दलाल यांनी वैधानिक लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे पुणे पोलिसांकडे १३ पानी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, १ जानेवारी २०१८ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांनी संचालक मंडळाची परवानगी न घेता संस्थेसाठी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे.

Buldana Urban Pune Scam
Buldana Urban |अफवेमुळे बुलढाणा अर्बनच्या शाखांबाहेर गर्दी!

तसेच तारण न घेता कर्जवाटप करणे, कर्जदारांकडून वसूल करावयाची व्याजाची रक्कम परस्पर माफ करणे, नियमबाह्य कर्ज प्रकरणांना मंजुरी देणे, स्वतःच्या फायद्यासाठी संस्थेतून शून्य टक्के दराने कर्ज घेणे आणि पूर्वपरवानगीशिवाय देखभाल खर्च करणे, असे विविध आरोप फिर्यादीत करण्यात आले आहेत. विविध खात्यांमध्ये गैरव्यवहार करून संस्थेचे सुमारे ३४ कोटी ७७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

शिरीष देशपांडे हे संस्थेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणारे अधिकारी म्हणून परिचित होते. संस्थापक-अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची ओळख होती. मात्र, संस्थेतील काही मतभेदांनंतर डिसेंबर २०२५ मध्ये त्यांनी सेवेतून मुक्तता घेतली होती. त्यानंतर संस्थेच्याच मुख्य लेखापालाच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने सहकारी पतसंस्था क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

Buldana Urban Pune Scam
Buldana Urban Bank | बुलढाणा अर्बन बँकेची शाखा बंद होण्याच्या अफवांमुळे धारूर येथील शाखेत ग्राहकांची मोठी गर्दी

या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी शिरीष देशपांडे आणि योगिनी पोकळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील करीत आहेत. पोलिसांच्या तपासानंतर या आर्थिक गैरव्यवहारातील वस्तुस्थिती आणि जबाबदारी निश्चित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news