

Buldana Urban Bank Dharur Branch Crowd
अतुल शिनगारे
धारूर: बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीची धारूर येथील शाखा बंद होणार असल्याच्या अफवांमुळे मंगळवारी (दि. ३०) बँकेत ग्राहकांची मोठी गर्दी झाली. वडवणी येथील शाखेमध्ये २९ डिसेंबर रोजी बँक बंद होण्याची चर्चा पसरल्याने धारूर परिसरातील खातेदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या भीतीपोटी अनेक ग्राहकांनी एकाच वेळी बँकेत धाव घेत आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी गर्दी केली.
सकाळपासूनच शाखेत बचत खाते, मुदत ठेव, सोने कर्ज खाते तसेच इतर व्यवहारांसाठी ग्राहकांची रांग लागली होती. काही ग्राहकांनी आपले ठेव खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली, तर काहींनी रोख रक्कम काढण्यासाठी गर्दी केली. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असला तरी सर्व व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कर्मचारी प्रयत्नशील होते.
या परिस्थितीत शाखा व्यवस्थापकांनी ग्राहकांना दिलासा देत स्पष्ट केले की बुलढाणा अर्बन बँक बंद होणार नाही. ग्राहकांच्या सोयीसाठी बँक रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असून, सर्वांनी शांतता व शिस्त राखून आपले व्यवहार करावेत, असे आवाहन त्यांनी केले. बँकेचे व्यवहार नियमितपणे सुरू राहणार असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अफवांमुळे बँकिंग व्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता प्रशासनानेही ग्राहकांना योग्य माहिती देण्याची गरज असल्याचे मत ग्राहकांनी व्यक्त केले आहे.
खातेदारांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि अफवांमुळे घाईगडबड करू नये. बुलढाणा अर्बन बँकेच्या धारूर शाखेत सर्व व्यवहार सुरळीत सुरू असून ग्राहकांनी निर्धास्तपणे बँकिंग सेवा घ्याव्यात
बप्पासाहेब लांडे, व्यवस्थापक धारूर शाखा