

Prataprao Jadhav Announcement Ayurveda Gurukulam Colleges
बुलढाणा : आयुर्वेद शिक्षण, संशोधन आणि औषधांच्या गुणवत्तापूर्ण परीक्षणाला चालना देण्यासाठी देशभरात आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. तसेच केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेच्या आठ परिघीय संस्थांमध्ये औषध परीक्षण प्रयोगशाळा (डीटीएल) सुविधा विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय आयुष तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी गुरुवारी (दि. १७) बुलढाणा येथे केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘शाश्वत विकासाची अविरत २५ वर्षे – सेवासंकल्प अभियान’अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात ५० खाटांच्या आयुष रुग्णालयाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी मंत्री जाधव बोलत होते.
आयुर्वेद, योग आणि आधुनिक वैद्यकीय उपचारांचा समन्वय साधून नागरिकांना एकात्मिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर केंद्र व राज्य शासनाचा भर असल्याचे जाधव यांनी सांगितले. आयुर्वेद आणि योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळत असून, विविध देशांकडून या उपचार पद्धतींबाबत प्रशिक्षण व माहितीची मागणी होत आहे. देशभरात आयुष्मान आरोग्य मंदिरे आणि आयुष विभागाच्या विविध सेवा कार्यान्वित करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
आयुर्वेद गुरुकुलम् ही निवासी संस्था असेल. येथे दोन वर्षांचा प्री-आयुर्वेदा कार्यक्रम आणि साडेसात वर्षांचा बीएएमएस पदवी अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. अध्यापनाचे माध्यम संस्कृत असेल. इयत्ता दहावीनंतर नीटद्वारे प्रवेश दिला जाणार असून, संस्था केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, जनकपुरी, नवी दिल्लीशी संलग्न असतील. महाराष्ट्रासह पाच राज्यांकडून २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी गुरुकुलम् स्थापनेचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
पुणे, पटियाला, जम्मू, कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, चेरुथुरुथी आणि बंगळुरू येथील आठ परिघीय संस्थांमध्ये औषध परीक्षण प्रयोगशाळा विकसित केल्या जाणार आहेत. यामुळे आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी औषधांची गुणवत्ता तपासणी, प्रमाणीकरण व मानकीकरण अधिक सक्षम होईल. विकेंद्रित परीक्षण सुविधा, जलद तपासणी आणि संशोधनाला चालना देत राष्ट्रीय डीटीएल नेटवर्क उभारण्याचा उद्देश असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्ष पूजा गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.