

बुलढाणा : जिल्ह्यात (Buldhana News) गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने नदीनाल्यांना पूर आला आहे. लहान-मोठ्या जलसंपदा प्रकल्पांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. काही धरणांचे गेट उघडून पाण्याचा विसर्ग वाढवला गेला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसंपदा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा नदीवरील (Khadakpurna flood) संत चोखासागरमध्ये (Sant Chokhasagar Dam) ९२ टक्के पाणीसाठा झाला आहे.
संत चोखासागर (Sant Chokhasagar Dam) प्रकल्पाचे १९ गेट ०.५० मीटरने उघडण्यात आल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढला असून खडकपूर्णा नदी दुथडी भरुन वाहत आहे. देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार व मंठा तालुक्यातून वाहणा-या खडकपूर्णा नदीकाठच्या ३३ गावांना तसेच प्रकल्प क्षेत्रातील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये टाकरखेड भागीले, निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, साठेगाव, दिग्रस खुर्द, निमगाव वायाळ, हिवरखेड, माहेरी खुर्द, राहेरी बु., ताडशिवणी, देवखेड, किर्ला, दुधा, साहेब, लिमखेड, हनवंतखेड, ऊसवद, वझर, सायखेडा, डिग्रस बु., टाकरखेड वायाळ, तढेगाव, पिंपळगाव कुंडा, लिंगा, खापरखेडा, सावरगाव तेली, वाघाळा, टाकरखेड इंचा, कानडी, देवठाणा, रायगाव, धानोरा बंजारा, आदी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.