बुलढाणा : यात्रेत तमाशा फड उभारतांना विजेच्या धक्क्याने दोन कामगारांचा मृत्यू | पुढारी

बुलढाणा : यात्रेत तमाशा फड उभारतांना विजेच्या धक्क्याने दोन कामगारांचा मृत्यू

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी येथील यात्रेत तमाशाचा फड उभारताना वीजेचा धक्का लागून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  आज (दि. २२) दुपारी घडलेल्या या घटनेने यात्रा परिसरात शोककळा पसरली आहे.

बेलदार समाजाचे आराध्यदैवत असलेल्या सती कान्हूमाता यांचे मंदिर पान्हेरा खेडी (ता. मोताळा) येथे आहे. देशाच्या विविध भागातून बेलदार समाजबांधव देवदर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. दरवर्षी दोन दिवसांची मोठी यात्रा येथे भरते. यात्रेत मनोरंजनासाठी आलेल्या जळगाव येथील आनंद लोकनाट्य तमाशा मंडळाचा फड उभा करत असताना या तमाशा संचातील दोन कामगारांच्या हातातील लोखंडी पाईपचा वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने जोरदार धक्का बसून ते जागीच कोसळले या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. अंकुश भारुडे (रा.नारायणगाव, जि.पुणे) व विशाल भोसले (रा.राजूर जि.जालना) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही फड उभारणीच्या कामाबरोबरच तमाशा संचात कलावंत म्हणूनही कामे करत असत. दोन तमाशा कर्मचा-यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने यात्रा परिसरात हळहळ व्यक्त झाली आहे. घटनेची माहिती कळताच धामणगाव बढे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.

हेही वाचा

Back to top button