Nagar : मक्याचे आगर दुष्काळाने होरपळले | पुढारी

Nagar : मक्याचे आगर दुष्काळाने होरपळले

गणेश जेवरे

कर्जत : मका पिकाचे आगर होत असलेल्या कर्जत तालुक्याला दुष्काळामुळे मोठा फटका बसला आहे. यावर्षी खरीप हंगामात तालुक्यात तब्बल 21 हजार 500 हेक्टर अशी विक्रमी मका पेरणी करण्यात आली. तालुका मका पिकाचे आगर अशी नवीन ओळख निर्माण करत असतानाच, लहरी निसर्गाचा फटका शेतकर्‍यांना बसला. पेरणीनंतर पुरेसा पाऊस न पडल्यामुळे अपेक्षित उत्पादन झाले नाही. शेतकर्‍यांना तब्बल 70 टक्के नुकसान सहन करावे लागले. तालुक्यात खरीप हंगामामध्ये तालुक्यात बाजरी, उडीद, तूर, मूग या पिकांना शेतकरी प्राधान्य देत होते. मात्र, मका पिकाचा शेतकर्‍यांना जनावरांसाठी होत असणारा फायदा, तसेच मक्याच्या उत्पादनानंतर मिळणारा भाव, हे सर्व फायदेशीर वाटत असल्यामुळे तालुक्यात बागायती बरोबरच जिरायत क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मका पिकाची पेरणी सुरू झाली. सन 2016 -17 पेक्षा यावर्षी कितीतरी पटीने मका पिकाचे क्षेत्र वाढल्याचे दिसून आले.
तालुक्यात खरीप हंगाम जून महिन्यामध्ये सुरू झाल्यानंतर हलका पाऊस पडला. यामुळे पेरण्या थोड्या लांबल्या. मात्र, जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. यामुळे पेरणी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र, ऑगस्ट महिना कोरडा गेला आणि त्याचा सर्वांत जास्त फटका मका पिकाला बसला. कर्जत तालुक्यात कृषी विभागाच्या माहितीनुसार मक्याचा हेक्टरी उतारा हा 28.74 क्विंटल असा पडतो. मात्र, यावर्षी पावसाअभावी मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट होऊन, तब्बल सत्तर टक्के उत्पादन घटल्याचे दिसून आले. यामध्येही जे उत्पादन झाले, ते काही प्रमाणात बागायत क्षेत्रामध्ये आहे.
जिरायत भागातील शेतकर्‍यांना सर्व पीक वाया जाऊन मोठे नुकसान सहन करावे लागले. उत्पादनात घट झाली असून, पुरेशा प्रमाणात मोठा दाणा निर्माण न झाल्याने वजनामध्ये घट झाली आहे. चांगला पाऊस पडला असता तर तालुक्यात विक्रमी मका उत्पादन झाले असते. त्याचा सर्वात जास्त फायदा शेतकर्‍यांना झाला असता. परंतु लहरी निसर्गाचा फटका मका पिकाला व शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणामध्ये बसला आहे.
बाजार समितीत मका 20 ते 25 रूपये या दराने खरेदी केली जात आहे. खर्चाच्या तुलनेत हा भाव कमी असून किमान 30 ते 35 रुपये तरी भाव मिळावा. 
                                                                                                        – अशोक जायभाय, शेतकरी
तालुक्यात यावर्षी विक्रमी खरीप मका पेरणी झाली होती. मात्र, कमी पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. मक्याला उतारा देखील कमी पडला आहे.     
                                                                                                 – पद्मनाभ मस्के,  तालुका कृषी अधिकारी
कर्जत मंडलात विक्रमी पेर
कृषी विभागाचे तालुक्यात चार मंडल आहेत. यापैकी मका पिकाची पेरणी प्रामुख्याने कर्जत मंडलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे. याशिवाय राशीन, कुलधरण या मंडलामध्ये देखील मका पिकाची लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून आले. तुलनेने मिरजगाव मंडलामध्ये मात्र कमी पेरणी झाली.

Back to top button