भंडारा: पुढारी वृत्तसेवा : प्लॉटच्या मोजणीकरीता २० हजारांची लाच मागून १५ हजार रुपये स्वीकारणाऱ्या साकोली भूमि अभिलेख कार्यालयाच्या दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई आज (दि. २७) करण्यात आली. छाननी लिपिक प्रवीण फुलचंद गिहेपुंजे, आणि मुख्यालय सहाय्यक राहुल गुलाबराव ब्रह्मपुरीकर अशी लाचखोरांची नावे आहेत.
यातील तक्रारदार यांची साकोली तालुक्यातील जांभळी येथे शेती आहे. सदर शेती निवासी प्रयोजनाकरिता, टीपी करिता त्यांनी नगर रचनाकार भंडारा यांच्याकडे अर्ज केला होता. नगर रचना कार्यालयाने तक्रारदार यांच्या अर्जावर कारवाई करून पुढील कारवाईकरिता तहसीलदार साकोली आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख साकोली यांना पाठविली होती.
त्यानुसार तक्रारदार यांनी १६ सप्टेंबररोजी भूमी अभिलेख कार्यालय, साकोली येथे नकाशाच्या मोजणी करीता अर्ज केला. त्यानुषंगणे तक्रारदार १७ सप्टेंबर रोजी भूमी अभिलेख कार्यालय साकोली येथे गेले व छाननी लिपिक गिहेपुंजे यांना भेटून प्लॉटची मोजणी करण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी नगर रचनाकार यांचे पत्र जुने आहे. ते चालणार नाही, असे सांगितले. व नवीन पत्र आणावे लागेल, असे तक्रारदार यांना सांगितले. तक्रारदार यांनी त्यांना मोजणी करून देण्याची पुन्हा विनंती केली असता छाननी लिपिक गिहेपुंजे आणि मुख्यालय सहाय्यक ब्रम्हपुरीकर यांनी एकमेकांशी चर्चा केली. ब्रम्हपुरीकर यांनी गिहेपुंजे यांना तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपये मागण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. २६ सप्टेंबररोजी सदर तक्रारीवरून पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान दोन्ही कर्मचाऱ्यांनी तडजोडअंती १५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
२७ सप्टेंबररोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी छाननी लिपिक गिहेपुंजे यांनी स्वत:करिता व मुख्यालय सहाय्यक ब्रम्हपुरीकर यांच्याकरीता पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून १५ हजार रुपये लाच स्वीकारली.
दोघांविरुद्ध साकोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार, पोलिस निरीक्षक अमित डहारे, पोलिस उपनिरीक्षक संजय कुंजरकर, मिथुन चांदेवार, अतुल मेश्राम, अंकुश गाढवे, राजकुमार लेंडे, नरेंद्र लाखडे, शिलपेंद्र मेश्राम, चेतन पोटे, मयूर शिंगणजुडे, विष्णू वरठी, राहुल राऊत, अभिलाषा गजभिये यांनी केली.