

Tiger in Bhnadara
भंडारा: तुमसर तालुक्यातील चांदमारा येथील बावनथडी नदीपात्र परिसरात दोन दिवसांपासून एका वाघाने ठिय्या मारला आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास नदीपात्रात ३० ते ३५ व ट्रॅक्टरमधून रेतीचा उपसा सुरू होता. त्याचदरम्यान एकाला नदीपात्राकडे वाघ येताना दिसला. त्याने आरडाओरड केल्यानंतर नदीपात्रातून ट्रॅक्टर सोडून तस्करांनी धूम ठोकली.
चांदमारा गावाजवळून बावनथडी नदी वाहते. दोन राज्यांची सीमा असलेल्या नदीपात्रात मध्य प्रदेशातील व महाराष्ट्रातील रेती तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसरात्र रेतीचा नियमबाह्यपणे उपसा सुरू आहे. मागील तीन दिवसांपासून या नदीपात्राजवळ एका वाघाचा ठिय्या असल्याचे दिसून येते. सोमवारी सकाळी रेती उपसा करणाऱ्या मजुराला वाघ नदीपात्राकडे येत असल्याचे दिसून आला. त्याने आरडाओरड केल्याने नदीपात्रात असलेल्या रेती तस्करांत एकच खळबळ माजली. काही रेतीतस्कर मध्यप्रदेशाच्या दिशेने पळाले तर काही महाराष्ट्राच्या दिशेने.
नदीपात्राजवळ वाघ हा पाण्याच्या शोधात आला असावा असा अंदाज आहे. नदीपात्र सध्या कोरडे पडून आहे. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र परिसरात हा संपूर्ण परिसर येतो. पहाटेला येथे अनेक ट्रॅक्टर रेती उपसा करण्याकरीता येतात. रात्रीही नदीपात्राजवळ रेती तस्करांच्या ठिय्या असतो. सोमवारी सकाळी रेती तस्करापैकी एकाला हा वाघ नदीपात्राच्या दिशेने येताना दिसला. आरडा ओरड केल्यानंतर हा वाघ माघारी परतला.
चांदमारा येथील घाट शासकीय रेती डेपो म्हणून मान्यता नाही. परंतु येथे मागील काही दिवसांपासून रेती तस्करांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. येथे रात्री नदीपात्रात जेसीबी मशीनही घातली जात असल्याची माहिती आहे. नदीकाठावर अगदी झुडपात जेसीबी मशीन लपवून ठेवण्यात आली आहे. याबाबत महसूल प्रशासनाला माहिती नाही काय? असा प्रश्न उपस्थित होतो. रेती चोरी प्रकरणात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतरही नियमित रेती चोरी होताना दिसून येते. जिल्हा महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसत आहे.