जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. याच पूराच्या पाण्यामध्ये वृद्ध व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली. पाथरी येथून चुलबंद नदीचां प्रवाह दुथडी भरून वाहत असताना गुरुवारी (दि.8) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास वृद्ध पाण्यातून वाहून गेला. मौजा पाथरी येथील रहिवासी रूपादास रामजी वलथरे (वय. 58) हे नदीपात्राकडे गायीला चारण्यासाठी गेले होते. यावेळी ते नदीच्या प्रवाहात वाहून गेले.
यानंतर पालांदूर येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने तसेच महसूल अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ यांच्या मदतीने पुरात वाहून गेलेल्या वलथरे याचा शोध घेणे सुरू आहे. नदीचा प्रवाह सातत्याने वाढत असल्यामुळे पाण्यामध्ये बोटचे जाणे ही अवघड आहे. नदीकाठाच्या गावातील तलाठी कोतवाल व पोलीस पाटील यांना नदीकाठावरील भागात शोध सुरू ठेवण्यास तहसीलदार निंबाळकर यांनी सांगितले आहे. परंतु उशिरापर्यंत वाहून गेलेला वलथरे याचा शोध लागलेला नाही.