

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
अलतगा येथील कंग्राळीला गेलेले दोघे तरुण पुन्हा गावाकडे परतताना वाहत्या पाण्यात दुचाकी पडल्याने एक जण वाहून गेला तर दुसरा वाचला. शनिवारी (दि.4) सायंकाळी अलतग्याजवळ ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की श्रावणमास सुरू होणार असल्याने अलतगा येथील ओंकार पाटील व ज्योतिनाथ पाटील हे दोघे तरुण दुचाकीवरून कंग्राळीला केस कापण्यासाठी गेले होते. केस कापून सायंकाळी गावी परतताना अलतग्याजवळ नाल्यात त्यांची दुचाकी पडली. पाण्याला वेग असल्याने दुचाकी वाहून जाऊ लागली. ओंकारने दुचाकी पकडण्याचा प्रयत्न केला असता तो देखील वाहून गेला. दुसरा तरुण ज्योतीनाथ ह तेथेच थांबल्याने वाचला. ओंकार वाहून गेल्याची माहिती येथे उपस्थितांना समजली. त्यांनी तातडीने ही माहिती काकती पोलिसांना दिली. काकतीचे पोलीस निरीक्षक उमेश एम. उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत बेपत्ता ओंकारचा शोध सुरू होता.