भंडारा: पुढारी वृत्तसेवा : भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी केंद्रे गरीब आणि गरजू लोकांचा आधार बनली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या शिवभोजन अॅपमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे शिवभोजन केंद्रचालक त्रस्त झाले आहेत. तर गरीब आणि गरजू लोकांना उपाशीपोटी न जेवताच परतावे लागत आहे.
या अॅपमध्ये सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी बऱ्यापैकी शिवभोजन केंद्रांवर अन्न शिजवून ठेवण्यात आले होते. परंतु अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शिजवलेले अन्न तसेच पडून राहिल्याने शिवभोजन केंद्र चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे अॅपच्या तांत्रिक अडचणीवर दुसरा पर्याय काढण्यात यावा, अशी मागणी शिवभोजन केंद्रचालक करत आहेत.
गरीब आणि गरजू लोकांना स्वस्त दरात जेवण मिळावे, यासाठी ठिकठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सध्याच्या काळात तर ही शिवभोजन केंद्रे अनेक गरजू कामगारांचा आधार बनली आहेत. मात्र, गेल्या सात-आठ दिवसांपासून या शिवभोजन अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे हे शिवभोजन थाळी केंद्रचालक त्रस्त झाले आहेत. शिवभोजन नावाचे अॅप शिवभोजन केंद्रचालकांना देण्यात आले आहे. या केंद्रावर जेवायला आलेल्या व्यक्तीचा या शिवभोजन अॅपमध्ये फोटो काढून तो सबमिट करावा लागतो. त्यानंतर त्या अॅपमधून त्या व्यक्तीच्या जेवणाचे कूपन येते. त्यानंतर त्या व्यक्तीला जेवण दिले जाते, अशी पद्धत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या अॅपमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने शिवभोजन केंद्र चालक त्रस्त झाले आहेत.