भंडारा: जिल्ह्यातील तीनही विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत विक्रमी मतदान झाले. मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने मतदानाची टक्केवारी ७०.८७ पर्यंत पोहोचली. आता या मतटक्का वाढीचा फायदा नेमका कुणाला होणार? यावर चर्चा सुरू आहेत.
राज्यात अडीच वर्षांपूर्वी झालेले सत्तांतर, त्यानंतर पक्षफुटीअखेर उदयास आलेली महायुतीची सरकार, यामुळे मतदार निवडणुकीकडे गांभीर्याने घेणार का? असा प्रश्न होता. परंतु, निवडणूक विभागाने उत्तम नियोजन करुन मतदारांना मतदान करण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबविले. त्याचा परिणाम मतदान वाढीवर झाला.
भंडारा विधानसभा क्षेत्रात महायुतीचे विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर, महाविकास आघाडीचे उमेदवार पूजा ठवकर आणि अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे हे रिंगणात आहेत. या क्षेत्रात मतदारांचा कल नेमका कुणाकडे आहे, हे अद्याप सांगता येत नसले तरी ही निवडणूक काट्याची असणार, असे संकेत आहेत. प्रचारादरम्यान तीनही उमेदवारांनी कोणतीही कसर सोडली नाही. आरोप, प्रत्यारोपांचा फैरी झडल्या. विकासाचे दृष्टीकोन मतदारांसमोर ठेवण्यात आले. त्यामुळे मतदारांनी नेमकी कुणाला पसंती दिली, हे मतमोजणीअखेर स्पष्ट होणार आहे. २०१९ मध्ये ६२.९ टक्के मतदान झाले होते. यावेळी ६८.२१ टक्के मतदान झाले आहे.
तुमसर विधानसभा क्षेत्रात महायुतीचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार चरण वाघमारे, अपक्ष उमेदवार ठाकचंद मुंगुसमारे आणि सेवक वाघाये आमोरासामोर आहेत. हा मतदारसघ प्रामुख्याने तेली, कुणबीबहुल आहे. दोन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार हे तेली समाजाचे आहेत. तर सेवक वाघाये कुणबी समाजाचे आहेत. जातीय समिकरणानुसार या मतदारसंघात मतदार कुणाच्या बाजुने वळतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. २०१९ मध्ये ७१ टक्के मतदान झाले होते. यावेळी ७४.१६ टक्के मतदान झाले आहे.
साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर भाजपाचे अविनाश ब्राम्हणकर आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी आव्हान दिले आहे. नाना पटोले यांचा पारंपरिक मतदारसंघ असून त्यांची या मतदारसंघावर जोरदार पकड आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. निकालाअंती नाना पटोले यांची पकड सैल होणार की अधिक बळकट होणार, हे स्पष्ट होणार आहे. २०१९ मध्ये ७१.७ टक्के मतदान झाले होते. यावेळी ७०.८२ टक्के मतदान झाले आहे.