

भंडारा : विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि दर्जेदार जेवण देण्याच्या शासकीय दाव्यांची राज्य अन्न आयोगाच्या तपासणीत पोलखोल झाली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये 'शालेय पोषण आहार योजने'ची पाहणी करत असताना, पवनी तालुक्यातील एका शाळेच्या स्वयंपाकघरात चक्क उंदराची विष्ठा आणि प्रचंड अस्वच्छता आढळून आली. विद्यार्थ्यांचे जेवण तयार होणाऱ्या ठिकाणीच घाणीचे साम्राज्य आढळल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून, राज्य अन्न आयोगाने संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य अन्न आयोगाच्या पथकाने मंगळवार, १ सप्टेंबर आणि बुधवार, २ सप्टेंबर रोजी भंडारा जिल्ह्याचा दौरा केला. पहिल्या दिवशी पथकाने पाच जिल्हा परिषद शाळांना भेट दिली, तर दुसऱ्या दिवशी खाजगी अनुदानित शाळांची पाहणी केली. यादरम्यान पथकाने चार शाळांमधील दुपारच्या भोजनाची (मिड-डे मील), अंगणवाडी केंद्रांमधील अन्नाची आणि अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत वाटप करण्यात येणाऱ्या धान्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
पवनी तालुक्यातील एका शाळेच्या स्वयंपाकघरात उंदराची विष्ठा सापडल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अन्नाचा दर्जा, चव आणि स्वच्छता तपासण्यासाठी मुलांना वाढलेल्या अन्नाची स्वतः चव घेऊन बारकाईने तपासणी केली. "विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबतचा निष्काळजीपणा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही," असा कडक इशारा आयोगाने दिला आहे.
अन्न आयोगाने दोषींवर त्वरित कारवाईचे निर्देश दिले असले, तरी गुरुवारपर्यंत याप्रकरणी संबंधित शाळेवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नव्हती.