

भंडारा : महायुती आणि महाविकास आघाडीत आपल्याच पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्येक पक्षाकडून दबावतंत्राचा वापर सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या भंडाऱ्याच्या जागेवर महायुतीतून भाजप तर महाविकास आघाडीतून ठाकरे गट आणि काँग्रेसने दावा केला आहे. तुमसरात शरद पवार गटातून माजी आमदार चरण वाघमारे यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध सुरू आहे. तर साकोलीमध्ये काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांच्याविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाला उमेदवारी मिळण्याच्या शक्यतेने भाजपने महायुतीविरोधातच बंड पुकारले आहे.
भंडारा विधानसभेवर शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी निवडणुकीची पूर्ण तयारी केली असताना भाजपने पुन्हा या जागेवर दावा केल्याने भोंडेकर यांची चिंता वाढली आहे. भोंडेकर यांना महायुतीची उमेदवारी मिळाल्यास मित्र पक्षांकडून त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. तर उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढण्यावर आ. भोंडेकर ठाम आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होती. त्यावेळी भंडारा विधानसभेची जागा भाजपकडे गेल्यावर नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. निवडून आल्यानंतर आ. भोंडेकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भोंडेकर यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याने भंडारा विधानसभेत भाजप उमेदवाराला मतांचा टक्का कमी पडला आणि त्यामुळेच भाजप उमेदवाराचा पराभव झाला, असा आरोप भाजप पदाधिकारी सातत्याने करताना दिसत आहेत. भंडारा विधानसभेच्या जागेवर भाजपने दावा केल्याने नरेंद्र भोंडेकर यांनीही कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन बंडखोरीचा इशारा देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. तथापि, नरेंद्र भोंडेकर यांना महायुतीची उमेदवारी मिळाल्यास त्यांना मात देण्यासाठी मित्र पक्षांकडून स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी चालवली असल्याची माहिती आहे. त्यामुळे भोंडेकर यांची चिंता वाढली आहे.
महाविकास आघाडीकडून या जागेवर उबाठा आणि कॉंग्रेसने दावा केला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भंडारा विधानसभेसाठी आग्रही असून कॉंग्रेसच्याच कोट्यात भंडाराची जागा गेल्याची माहिती आहे. अशास्थितीत आ. भोंडेकर यांच्याविरोधात उबाठा गटाकडून स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे भंडारा विधानसभेची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
साकोली मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. परंतु, महायुतीकडून अद्याप उमेदवाराबाबत गुप्तता पाळली गेली आहे. आ. परिणय फुके विधानपरिषदेवर निवडून गेल्याने नाना पटोले यांच्याविरोधात सक्षम उमेदवाराचा शोध भाजपकडून सुरू आहे. दरम्यान, या मतदारसंघात नाना पटोले यांना मात देण्यासाठी त्यांचे पारंपारीक प्रतिस्पर्धी खा. प्रफुल पटेल यांनी दंड थोपाटले आहे. कोणत्याही स्थितीत साकोलीमध्ये महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळेच साकोलीच्या जागेवर भाजपऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाला संधी मिळावी, यासाठी खा. प्रफुल पटेल आग्रही आहेत. ही बाब समोर येताच साकोली विधानसभा क्षेत्रातील भाजप कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत. भाजपची हक्काची जागा असताना भाजपला डावलून राष्ट्रवादीला ही जागा सोडल्यास आम्ही सामूहिक राजीनामे देऊ, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असा इशारा या क्षेत्रातील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी बोलून दाखवित आहेत. त्यामुळेच ही जागा भाजपकडेच राहावी, यासाठी भाजप पदाधिकारी नागपूरात जाऊन पक्षश्रेष्ठींकडे दबाव वाढवित आहेत. आता ही जागा नेमकी कुणाच्या वाट्याला येते, हे लवकरच समोर येणार आहे.
तुमसरचे भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी शरद पवार गटात प्रवेश करताच शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी असंतोष व्यक्त केला आहे. ही नाराजी त्यांनी मुंबई येथे जाऊन खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे व्यक्त केली आहे. कोणत्याही स्थितीत चरण वाघमारे यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही स्वतंत्र उमेदवार उभा करु, असा दबाव निर्माण केला जात आहे. समाजमाध्यमांवर शरद पवार गटाचे कार्यकर्ते चरण वाघमारेंविरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, चरण वाघमारे ही निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. विकास फाऊंडेशनच्या बॅनरखाली त्यांच्याकडे असलेली कार्यकर्त्यांची मोठी फळी ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. तुमसरातून शरद पवार गटाकडून चरण वाघमारे यांचे नाव निश्चित असल्याने शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा सामना रंगणार आहे. परंतु, चरण वाघमारेंविरोधात शरद पवार गटाने तयार केलेल्या दबावावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे अनेकांच्या नजरा लागून आहेत.