

Bhandara Warthi tipper accident
भंडारा : वरठी येथे सोमवारी (दि.५) रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. आदित्य लॉन समोर रेती वाहून नेणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार युवक टिप्परच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नीलेश शेंडे (वय २५) असे मृताचे नाव आहे. हा तरुण आपल्या दुचाकी (एमएच ३६ एएन २२२९) ने प्रवास करत होता. याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेतीवाहू टिप्परने (एमएच ४० डीसी ३५७७) त्याच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, नीलेश टिप्परच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
वरठी आणि आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर रेतीची वाहतूक केली जाते. रेती वाहून नेणारे हे टिप्पर अत्यंत भरधाव वेगाने आणि नियमांचे उल्लंघन करून चालवले जातात, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या मार्गावर टिप्परमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले असून, आजच्या घटनेने एका पंचवीस वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
अपघाताची माहिती मिळताच वरठी पोलिस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. अपघातातील टिप्पर आणि दुचाकी ताब्यात घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. वारंवार होणाऱ्या या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे