

Tractor Accident Lakhandur
भंडारा : लाखांदूर शहरात ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टरवरील चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. तर मद्यधुंद असलेला चालक गंभीररित्या जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २६) सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. दक्ष अवसरे (वय ४ ) असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. निलेश अवसरे (वय २८, दोघेही रा. लाखांदूर) असे जखमीचे नाव आहे.
निलेश अवसरे हा ट्रॅक्टरने सहकाऱ्यांसोबत जात असताना ट्रॅक्टर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात जात होता. याचदरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट दुभाजकाला धडकला. अपघात इतका भीषण होता की, ट्रॉली रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटली. उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
दक्ष अवसरे याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्याला तात्काळ पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे रेफर करण्यात आले आहे. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर निलेश अवसरे याच्यावर लाखांदूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रॅक्टरचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला. मृत दक्ष हा ट्रॅक्टर चालकाचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली आहे.