

अजय ढवळे
वाशिम: जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरात प्रशासनाच्या आदेशानुसार श्वेतांबर पंथाच्यावतीने मंदिराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले होते.सदर कॅमेरे दिगंबर पंथाच्या महेश शिखरचंद जैन यांने दि.१८ डिसेंबर रोजी फोडले तसेच दि.२१ डिसेंबर रोजी दिगंबर पंथाच्या कर्मचाऱ्यांनी श्वेतांबर समाजाचे प्रियंक सेठ यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यामुळे मंदिरातील कॅमेरे फोडणाऱ्या आरोपी महेश जैन यांच्यासह सेठ यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना त्वरीत अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्वेतांबर समाजाच्यावतीने जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर असे की,शिरपूर जैन येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरात प्रशासनाच्या आदेशानुसार मंदिर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.मात्र मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेले कॅमेरे दिगंबर पंथाच्या महेश जैन याने दि.१८ डिसेंबर रोजी मुद्दामहून दादागिरी करून सदरचे कॅमेरे फोडले होते.
दिगंबर पंथाच्या या कृत्यामुळे मंदिरातील सुरक्षा बाधित झाली असून मंदिर परिसरातील शांतता कायद्या व सुव्यवस्था धोक्यात आलेले आहे.या ठिकाणी कोणत्याही क्षणी वाद व अशांतता वाढून सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो याबाबतची तक्रार पोलीस निरीक्षक शिरपूर यांना देण्यात आली असून सदर कृत्य करणाऱ्या सर्व आरोपींवर कारवाई करण्याची मागणी पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली होती.
सदर फोडण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे दि.२१ डिसेंबर रोजी श्वेतांबर पंथाचे कर्मचारी लावत असताना आरोपी महेश जैन याच्या सांगण्यावरून दिगंबर पंथांच्या कर्मचाऱ्यांनी श्वेतांबर पंथीयांचे प्रियंक सेठ यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवाने मारण्याचा प्रयत्न केला होता.या हल्ल्यात सेठ यांना गंभीर दुखापत झाली होती.याबाबतची तक्रार सुद्धा शिरपूर ठाणेदार,जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांना देण्यात आली होती.
मात्र या प्रकरणी अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नसून फोडण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी सुद्धा पोलिस प्रशासनातर्फे सहकार्य करण्यात आले नाही. त्यामुळे दिगंबर पंथांच्या संबंधित व्यक्तींविरुद्ध तातडीने कारवाई करण्यात यावी व सुरक्षेच्या दृष्टीने फोडण्यात आलेले कॅमेरे तातडीने लावण्यात यावे अशी मागणी श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानच्या वतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.