

Injured Tiger Spotted in Bhandara
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील धानोरी गावाजवळ गोसीखुर्द धरणाच्या (इंदिरा सागर प्रकल्प) मुख्य उजव्या कालव्यात एक जखमी वाघ आढळला आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.९) सकाळी सुमारे ७ ते ८ वाजताच्या दरम्यान पवनी-सावरला रस्त्यालगतच्या कालव्यात हा वाघ पडलेला दिसला. वाघ जखमी असल्याने हालचाल करू शकत नव्हता आणि कालव्यात निपचित पडला होता. ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली. वन अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
जखमी वाघाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय उपचार देण्याची तयारी सुरू करण्यात आली. मानवी-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी परिसर सील करण्यात आला. धानोरी कालव्यातील जखमी वाघाची यशस्वी सुटका करून नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रात पुढील उपचारांसाठी हलवले.
दरम्यान, रात्री अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांनी वाघाला धडक मारली असावी, असा अंदाज धानोरी गावातील ग्रामस्थांतून व्यक्त केला जात आहे. पुढील तपास वन विभाग करत आहे.