

भंडारा : साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मादक पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. साकोली पोलिसांनी केलेल्या या कारवाईत गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून तब्बल १ कोटी रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
आज पहाटे २ ते ३ च्या दरम्यान साकोली पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, राजनांदगावकडून नागपूरच्या दिशेने एका संशयित टाटा ट्रकमधून (क्रमांक WB 23 F 8785) मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक केली जात आहे. माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. सेंदूरवाफा टोलनाक्यावर ट्रक येताच पोलिसांनी तत्परता दाखवत तो अडवला आणि त्याची कसून झडती घेतली.
ट्रकची तपासणी केली असता, त्यात अत्यंत चलाखीने लपवून ठेवलेला गांजा पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी पंचांसमक्ष केलेल्या मोजमापानंतर तब्बल १९९.५६० किलोग्राम वजनाचा गांजा जप्त केला. बाजारपेठेत या जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे ९९ लाख ७८ हजार रुपये इतकी आहे. याशिवाय, अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ३५ लाख रुपये किमतीचा टाटा ट्रक आणि इतर साहित्य असा एकूण १ कोटी ३४ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या धडक कारवाईदरम्यान पोलिसांनी ट्रक चालक आणि क्लिनर अशा दोघांना घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. पंकज कुमार भूषण यादव (वय ३०, रा. छपरा, बिहार) आणि बापी बादल मलिक (वय ३८, रा. वर्धमान, पश्चिम बंगाल) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही वेगवेगळ्या राज्यांतील असून या आंतरराज्यीय रॅकेटमध्ये नेमके कोण कोण सहभागी आहेत, याचा सखोल तपास सुरू आहे.
या दोन्ही आरोपींविरोधात साकोली पोलीस ठाण्यात 'एनडीपीएस' (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात असून, हा गांजा कोणी पाठवला होता आणि कुठे पोहचवला जाणार होता, याचा शोध घेतला जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे आणि साकोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. या कारवाईत साकोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र राऊत, पोलीस उपनिरीक्षक किशोर मानकर, अर्जुन बेडवाल, स्वप्नील गोस्वामी, नरेंद्र झलके, सचिन राऊत, टेकचंद बुरडे, गोविंद शिंदे, धनविजय गणवीर यांच्या पथकाने सहभाग घेतला.