

Bhandara Gold Trafficking
भंडारा: नुकतेच रेल्वेतून झालेल्या दोन मोठ्या सोन्याच्या तस्करीच्या कारवायांनंतर आता तस्करांनी आपला मोर्चा रस्तामार्गाकडे वळविला आहे. नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराज्य महामार्गाचा वापर करून सोन्याची तस्करी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. तुमसरमार्गे जाणारा भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्ग आणि भंडारा-वाराशिवनी हा आंतरराज्य मार्ग सध्या तस्करांसाठी ‘सुरक्षित कॉरिडॉर’ ठरत आहे.
बावनथडी व वैनगंगा नदीच्या पलीकडे असलेल्या मध्यप्रदेशाच्या सीमेतून सोन्याची हालचाल होत असून, बपेरा, नाकाडोंगरी व गोबरवाही येथील तपासणी चौक्यांवर फक्त नाममात्र तपासणी होत असल्याची चर्चा आहे. या मार्गाने मध्यप्रदेशातील बालाघाट, जिल्हा सिवनी व जबलपूर भागातून तस्करीचे सोने महाराष्ट्रात प्रवेश करत असून अखेर नागपूरपर्यंत पोहोचत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी रेल्वेमार्ग सुरक्षित मानला जात होता. मात्र रेल्वेच्या विजिलन्स विभागाने केवळ चार दिवसांत दोन मोठ्या सोन्याच्या तस्करीच्या कारवाया उघड केल्यानंतर तस्करांचे धाबे दणाणले. त्यामुळे आता त्यांनी महामार्ग हा नवीन पर्याय निवडल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या मार्गाने फक्त सोनेच नव्हे, तर मध्यप्रदेशातून गांजाचीही तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे. सीमावर्ती भागांवर पोलिस आणि वनविभागाची यंत्रणा निष्क्रिय असल्याने तस्करांचे फावत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी वाढल्याने या काळात तस्करी अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुमसर-बालाघाट व तुमसर-कटंगी महामार्गावर पोलिसांचे फिरते पथक, तपासणी नाके आणि चौक्या उभारण्याची तातडीची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.